नाथसागरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; दीड महिन्यात केवळ ३ टक्के आवक

Foto
जलसाठा ३१.२४ टक्क्यांवर असलेल्या नाथसागर (जायकवाडी) 

पैठण,  : मराठवाड्याची जीवनवाहिनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने मोठी दडी मारली आहे. पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही जलाशयात केवळ ३ टक्के पाण्याची आवक झाली असून, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्यासह शेती आणि सिंचनाची चिंता वाढली आहे.

सह्याद्री परिसरासह गोदावरी खोऱ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने नाथसागरमध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. परिणामी जलाशयातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. तसेच पैठण तालुक्यातील लहान मोठे तलाव अद्यापही कोरडे ठणठणीत आहेत. यंदाच्या पावसाच्या कमतरतेचे चित्र जलाशयातील पाणीसाठ्यावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. १९ जुलै २०२५ रोजी नाथसागर जलाशयात ७७.६१ टक्के पाणीसाठा होता. 

मात्र, १९ जुलै २०२६ रोजी हा साठा केवळ ३१.२४ टक्क्यांवर आला आहे. तालुक्यात फक्त ७३ मिमी पाऊस पडला आहे.. अवघ्या एका वर्षात पाणीसाठ्यात झालेली ही मोठी घट मराठवाड्यासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पैठण तालुक्यातील खरीप पिके करपू लागली आहेत. सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या आता ओलाव्याअभावी संकटात सापडल्या आहेत. अनेक ठिकाणी उगवलेली पिके वाळू लागली असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अतिरिक्त खर्च, बियाण्यांची उपलब्धता आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नाथसागर जलाशयावर संपूर्ण मराठवाड्याचे पिण्याचे पाणी, सिंचन आणि औद्योगिक वापर अवलंबून असल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. आगामी काही दिवसांत नाथसागरच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही, तर
पिण्याच्या पाण्याबरोबरच खरीप आणि रब्बी हंगामावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यासह सर्वांचे लक्ष पावसाच्या पुनरागमनाकडे लागले आहे.